ओबीसी बहुजन पक्षाकडून किशोर वचकल यांचा उमेदवारी अर्ज दाखल.
निवडणूक जनशक्ती विरूद्ध धनशक्ती अशी होईल- किशोर वचकल

पुणे जिल्हा प्रतिनिधी
पुरंदर पंचायत समिती वीर गणातील वातावरण दिवसेंदिवस निवडणूक जवळ येईल तसे गरम होताना दिसत आहे. ओबीसी बहुजन पक्षाकडून आज वीर गावचे सुपुत्र समता परिषद पुणे जिल्ह्याचे प्रसिद्धी प्रमुख सामजिक कार्यकर्ते किशोर वचकल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. किशोर वचकल यांनी ओबीसी महामंडळाच्या योजना वीर गणामध्ये यशस्वीपणे राबविल्या आहेत. त्याबरोबर समता परिषद मध्ये काम करत असताना सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्याचं काम केले आहे. यावेळी त्याच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की पंचायत समिती मार्फत ज्या काही योजना राबविल्या जातात त्या योजना शेतकरी वर्गापर्यंत पोहचत नाहीयेत त्या प्रभावीपणे शेतकरी वर्गापर्यंत पोहचल्या पाहिजेत या साठी आपले प्रयत्न असणार आहेत. सामाजिक तसेच राजकीय जीवनात कार्य करत असताना गरीब, कष्टकरी मजूर, यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या आपण सोडवल्या आहेत परंतु सामान्य माणसाचा आवाज निर्णय घेणाऱ्या खुर्ची पर्यंत पोहचविण्यासाठी आपण ही निवडणूक लढवत आहोत. ही निवडणूक जनशक्ती विरूद्ध धनशक्ती अश्या प्रकारे होणार असून सर्वसामान्य मतदार राजा नक्कीच मताच्या रूपाने आशीर्वाद देईल अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली.




