दौंडचे नगरसेवक रोहित पाटील यांना मोठा धक्का; कुणबी जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीकडून रद्द

दौंड:
पुणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने एक महत्त्वपूर्ण निर्णय देत दौंड नगर परिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांचे कुणबी जात प्रमाणपत्र अवैध ठरवून रद्द केले आहे. या निर्णयामुळे दौंडच्या राजकारणात खळबळ उडाली असून, आमदार राहुल कुल आणि माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.
नेमके प्रकरण काय? रोहित पाटील यांनी प्रभाग क्रमांक ४ मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) आरक्षित जागेवरून नगरसेवकपदाची निवडणूक लढवली होती आणि ते निवडून आले होते. मात्र, त्यांच्या जात प्रमाणपत्रावर रतन जाधव, सुशांत वाघमारे, सचिन कुलथे, मृणाल ढोले-पाटील आणि अनिकेत भागवत यांनी आक्षेप घेत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत एडवोकेट मंगेश ससाणे यांनी समितीसमोर बाजू मांडली.
समितीचे निरीक्षण: जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष अमोल यादव, सदस्य सचिव शिवकांत चिकूर्ते आणि सदस्य संजय दाणे यांनी या प्रकरणाची सुनावणी घेतली. समितीने आपल्या निरीक्षणात नमूद केले की, रोहित पाटील यांनी जात प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या पुराव्यांमध्ये मोठी विसंगती आढळली. रक्ताचे नातेसंबंध सिद्ध करण्यासाठी आवश्यक असणारे शालेय किंवा महसूल पुरावे त्यांनी सादर केले नाहीत. केवळ पाटील आडनाव असलेल्या स्थानिक नागरिकांचे प्रतिज्ञापत्र आणि लेखी जबाबाच्या आधारे त्यांनी कुणबी जातीचा दावा केला होता, जो समितीने फेटाळून लावला आहे.
नगरसेवक रोहित पाटील यांची प्रतिक्रिया: या निर्णयाबाबत बोलताना रोहित पाटील म्हणाले, “मला १६ जून २०२६ रोजीच्या जात पडताळणी समितीच्या निकालाची कोणतीही अधिकृत शासकीय माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. सोशल मीडियावरून मला याची माहिती मिळाली आहे. अधिकृत निकाल हाती आल्यानंतर मी माझ्या कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून पुढील न्यायालयीन प्रक्रिया काय करायची, याचा निर्णय घेईन.”या निकालानंतर आता रोहित पाटील यांचे नगरसेवक पद धोक्यात आले असून, आगामी काळात हे प्रकरण न्यायालयात कोणत्या वळणावर जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


