नागवडे इंग्लिश मिडीयम स्कूलची बाळदिंडी दिंडी उत्साहात संपन्न.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग.

अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी
तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित शिवाजीराव नागवडे डॅफोडील्स स्कूल व कौशल्यादेवी नागवडे इंग्लिश मेडियम स्कूलच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आषाढी दिंडी उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. “माऊली माऊली” नामघोष, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि विठ्ठलभक्तीच्या जयघोषाने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. यावेळी विद्यार्थ्यांसह पालकांचीही विशेष उपस्थिती लाभली.

शाळेतून दिंडीचे प्रस्थान होऊन बगाडे कॉर्नर, शनी चौक मार्गे श्रीगोंद्याचे ग्रामदैवत सद्गुरू श्री संत शेख महंमद महाराज मंदिर प्रांगणात रिंगण सोहळा पार पडला. वारकरी परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या या उपक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी. के. लगड होते ,प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, केंद्रप्रमुख उत्तरेश्वर मोहोळकर, कैलास खेतमाळीस यांची उपस्थिती लाभली. तसेच पालक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी विज्ञान आणि दिंडी सोहळा याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बी. के. लगड यांनी वारी सोहळ्याचे महत्व सांगितले व अश्या प्रकारे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मूल्य जपण्याची भावना निर्माण होते असे मत व्यक्त केले.
यावेळी पालक प्रतिनिधी रुपेश काळेवाघ आणि किरण देसाई यांनी मनोगत व्यक्त करत शाळेच्या सांस्कृतिक व मूल्याधिष्ठित उपक्रमांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेली विसोबा खेचर भक्ती नाटिका, लेझीम नृत्य तसेच विठ्ठल गीतांवर आधारित नृत्य सादरीकरणांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले आणि संपूर्ण वातावरण विठ्ठलमय झाले.दिंडीचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल राजेंद्र पोकळे यांनी शाळेचे निरीक्षक, मुख्याध्यापिका यांचा सन्मान केला. तसेच त्रिमूर्ती भेळ यांच्या वतीने सर्वांसाठी फरसाणाचे वाटप करण्यात आले. नागवडे स्कूलच्या या दिंडी सोहळ्याने विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, संस्कार आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तुळजाभवानी प्रतिष्ठान चे अध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे, विश्वस्त अनुराधाताई नागवडे, निरीक्षक एस.पी.गोलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका नीतू दुलानी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.यावेळी सूत्रसंचालन प्रा. जयेश आनंदकर यांनी तर आभार प्रा. रूपाली गायकवाड यांनी मानले.










