शेतकरी प्रगतीसाठी भाजपा किसान मोर्चाचा पुढाकार; खंडू खैरेवाडीत तूर व उडीद पीक मार्गदर्शन शिबिर संपन्न

सुपे (ता.बारामती):-खंडू खैरेवाडी येथे तूर व उडीद पिकावरील मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न
पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा आणि कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आज खंडू खैरेवाडी (ता. बारामती) येथे तूर व उडीद पिकाचे उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्हा भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष महेशजी जाधव यांनी केले.
या शिबिरात कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ डॉ. धीरज शिंदे सर व पोपट जी गावडे सर यांनी तूर व उडीद पिकामध्ये अधिक उत्पादन मिळविण्यासाठी आधुनिक शेती तंत्रज्ञान, संतुलित खत व्यवस्थापन, रोग व कीड नियंत्रण तसेच उत्पादनवाढीसाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच गावडे साहेब आणि जाधव साहेब (आत्मा) यांनीही शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना तूर व उडीद पिकाचे दर्जेदार बियाणे मोफत वितरित करण्यात आले. या उपक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
तसेच तानाजी बापू पवार यांना जिजामाता पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिग्विजयजी काकडे, जिल्हा महामंत्री वैभव आटोळे, शिवसेना आरोग्य कक्षाचे नेते मंगेशजी खताळ, जिल्हा मीडिया प्रमुख अप्पासाहेब भोपाळ , सरपंच चांदगुडेवाडी अशोक खैरे, सदस्य विनोद सस्ते , ग्रामपंचायत मोरगाव सदस्य सचिन गार्डी, प्रगतशील शेतकरी बाळासाहेब भोंडवे, विजय खैरे सर, प्रकाश चांदगुडे तसेच परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी व महिला शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांनी तज्ज्ञांचे मार्गदर्शन उत्स्फूर्तपणे ऐकून विविध कृषी विषयक शंकांचे निरसन करून घेतले. आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करून उत्पादनवाढ साध्य करण्यासाठी अशा मार्गदर्शन शिबिरांचा मोठा लाभ होत असल्याची भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली.










