Uncategorized

खुल्या महाराष्ट्र राज्य तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद.

७५० हून अधिक खेळाडूंचा सहभाग; अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक सेन्सर तंत्रज्ञानामुळे सामने अधिक पारदर्शक.

अहिल्यानगर : तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने जिल्हा तायक्वांदो असोसिएशन, अहिल्यानगर यांच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल, वाडिया पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या खुल्या महाराष्ट्र राज्य तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पीव्ही, सब-ज्युनिअर, कॅडेट, ज्युनिअर आणि युथ गटातील महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून ७५० हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवत पुमसे आणि क्योरुगी या दोन्ही प्रकारांमध्ये उत्कृष्ट कौशल्याचे दर्शन घडविले. स्पर्धेतील चुरशीच्या लढतींमुळे क्रीडारसिकांनाही उच्च दर्जाच्या तायक्वांदो स्पर्धेचा अनुभव घेता आला.

स्पर्धेचे उद्घाटन आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात झाले. यावेळी तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष संदीप ओंबासे, महासचिव गफार पठाण, खजिनदार डॉ. प्रसाद कुलकर्णी, शहर संघटनेचे अध्यक्ष माणिकराव विधाते, नगरसेवक महेश तवले, दत्ता गाडळकर, विशाल पवार, सुमित लोंढे, सनी वाघस्कर यांच्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी, प्रशिक्षक, पंच आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना आमदार संग्राम भैया जगताप म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणासोबतच आपल्या आवडीच्या क्रीडा प्रकारातही सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. आज क्रीडा क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि जिद्दीच्या बळावर राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करता येते. क्रीडा केवळ पदके मिळवून देत नाही, तर व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्वास आणि निरोगी जीवनशैली घडविण्यातही महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एका क्रीडा प्रकाराशी नाते जोडावे.”

स्पर्धेतील सामने अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक सेन्सर स्कोअरिंग प्रणालीद्वारे खेळविण्यात येत असल्याने प्रत्येक गुणाचे अचूक, निष्पक्ष आणि पारदर्शक गुणांकन होत आहे. जागतिक तायक्वांदो महासंघाच्या निकषांनुसार वापरण्यात येणाऱ्या या आधुनिक तंत्रज्ञानामुळे खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचा प्रत्यक्ष अनुभव मिळत असून स्पर्धेचा दर्जाही अधिक उंचावला आहे.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे संजय आनंदकर, राज्य उपाध्यक्ष घनश्याम सानप तसेच अरुणोदय क्रीडा प्रतिष्ठानचे संचालक महेश आनंदकर, गणेश वंजारे, धर्मनाथ घोरपडे, ऋषीकेश घोडेकर, चेतन जावळे, कार्तिक मोढवे,सार्थक कराळे यांच्यासह सर्व पदाधिकारी, प्रशिक्षक, पंच आणि स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत. स्पर्धेतील नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्था आणि आधुनिक तांत्रिक सुविधांबाबत उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे विशेष कौतुक केले.

राज्यातील गुणवंत तायक्वांदोपटूंना दर्जेदार स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गुणवत्तापूर्ण स्पर्धांचे आयोजन करण्याचा तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचा उपक्रम राज्यातील तायक्वांदोच्या विकासासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button