प्रलंबित मागण्यांवर निर्णय न झाल्यास १३ जुलैपासून आमरण उपोषण करणार तुषार किसनराव नवले यांचा इशारा.

अहिल्यानगर, प्रतिनिधी : ग्रामपंचायत टाकळी कडेवळीत येथील नागरिकांच्या मूलभूत सुविधा व विकास कामांशी संबंधित अनेक प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात प्रशासनाला १३ प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले असून, या मागण्यांवर तात्काळ व सकारात्मक कार्यवाही न झाल्यास श्री. तुषार किसनराव नवले हे सोमवार, दि. १३ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत कार्यालय, टाकळी कडेवळीत येथे आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
ग्रामस्थांनी सादर केलेल्या निवेदनात जलजीवन मिशनअंतर्गत प्रत्येक घरापर्यंत नियमित व शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करणे, रोजगार हमी योजना व घरकुल योजनेतील प्रलंबित मजुरी, अनुदान व हप्ते तात्काळ वितरित करणे, गावातील विविध रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण करणे, निकृष्ट दर्जाच्या विकासकामांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची नवीन इमारत उभारणे, गावठाण व वाडी- वस्त्यांवरील अखंड वीजपुरवठा सुरू करणे, ग्रामपंचायतीच्या मागील सहा वर्षांतील आर्थिक व्यवहारांचे स्वतंत्र विशेष लेखापरीक्षण करणे तसेच दिंडी सोहळ्यासाठी प्राप्त झालेल्या निधीचा संपूर्ण तपशील सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, विविध शासकीय कार्यालयांकडे अनेकदा निवेदने व पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
प्रशासनाने तातडीने या मागण्यांवर निर्णय घेऊन ग्रामस्थांना न्याय द्यावा, अन्यथा सुरू होणाऱ्या आमरण उपोषणाची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने करण्यात येणार असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली जाईल, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.









