विद्यार्थ्यांकडून डॉक्टरांचा सत्कार; डॉक्टर डे उत्साहात साजरा.

अहिल्यानगर प्रतिनिधी :
राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त नागवडे इंग्लिश मिडीयम स्कूल येथील विद्यार्थी व शिक्षकांनी ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा, मेडीकेअर हॉस्पिटल, पाटील हॉस्पिटल, मातोश्री हॉस्पिटल, सिद्धिविनायक हॉस्पिटल, भापकर हॉस्पिटल येथे भेट देऊन डॉक्टरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी विद्यार्थ्यांनी डॉक्टरांच्या समाजसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
डॉक्टरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आरोग्याची काळजी, स्वच्छता, योग्य आहार आणि नियमित व्यायामाचे महत्त्व सांगितले. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभाव आणि डॉक्टरांचे समाजातील योगदान याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी डॉक्टरांना शुभेच्छापत्र देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. डॉक्टरांनीही विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि कृतज्ञतेची भावना निर्माण होते, असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला संस्थेचे निरीक्षक एस.पी. गोलांडे , मुख्याध्यापिका नीतू दुलानी, शिक्षकवृंद, रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











