राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनच्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी किशोरभाऊ वचकल तर उपाध्यक्षपदी सुरेश म्हेत्रे यांची निवड.

प्रतिनिधी : राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनच्या संघटनात्मक विस्तार व समाजहिताच्या कार्याला अधिक बळकटी देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी किशोरभाऊ वचकल तर पश्चिम महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी सुरेश म्हेत्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे अधिकृत नियुक्तीपत्र राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उमेश नानासाहेब आनेराव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनच्या माध्यमातून ओबीसी समाजातील एकता, शिक्षण, रोजगार, सामाजिक न्याय आणि सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना संघटनेत महत्त्वाची जबाबदारी देण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने समाजकार्यातील योगदान, संघटन कौशल्य आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी लक्षात घेऊन वीर ता.पुरंदर जि.पुणे येथील मा.किशोरभाऊ वचकल यांची पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
तसेच, श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथील सामाजिक कार्यकर्ते मा.सुरेश म्हेत्रे यांची पश्चिम महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ओबीसी समाजातील जनजागृती, संघटन बांधणी आणि सामाजिक प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी दोघांवरही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
यावेळी उमेश आनेराव यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “ओबीसी समाजाच्या हक्क, शिक्षण, रोजगार आणि विकासाच्या लढ्यात संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी नव्या पदाधिकाऱ्यांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरेल. समाजहिताच्या विविध उपक्रमांद्वारे संघटना अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करावे.”
नियुक्तीनंतर किशोरभाऊ वचकल आणि सुरेश म्हेत्रे यांनी संघटनेने दिलेल्या जबाबदारीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी, युवकांच्या सक्षमीकरणासाठी, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी तसेच संघटनेची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या निवडीबद्दल विविध सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून दोन्ही पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.









