
पुणे – ग्राहक हक्कांच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या अखिल भारतीय ग्राहक पंचायत या देशपातळीवरील नामांकित संघटनेच्या हवेली तालुकाध्यक्षपदी श्री. संदिप शिवरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संघटनेच्या वतीने नुकतीच ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांत बैठक कुकडी प्रकल्प, विश्रामगृह, नारायणगाव, ता. जुन्नर; जि. पुणे येथे संपन्न झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
श्रीक्षेत्र ओझर, जुन्नर येथे होणाऱ्या मध्य महाराष्ट्र प्रांताचा दोन दिवसीय निवासी अभ्यास वर्ग दि. २५ व २६ ऑक्टोबर २०२५ रोजी असल्याने त्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आलेली होती. त्यावेळी सदर बैठकीमध्ये मध्य महाराष्ट्र प्रांत सदस्य भानुदास सरडे व पुणे जिल्हा कोषाध्यक्ष राघवदास चौधरी यांच्या वतीने जिल्ह्याचे सचिव श्री. अशोक भोर यांनी हवेली तालुका अध्यक्षपदी संदिप शिवरकर यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
श्री. शिवरकर हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून, त्यांनी ग्राहकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. तसेच ते सध्या महाराष्ट्र शासनाच्या जिल्हाधिकारी पुणे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर ते सदस्य म्हणून काम करत आहेत. त्यांच्या कार्यक्षमतेची दखल घेत अखिल भारतीय ग्राहक पंचायतने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवलेली आहे.
नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना श्री. शिवरकर म्हणाले, “ही जबाबदारी माझ्यासाठी सन्मानाची असून, ग्राहकांच्या हितासाठी मी सदैव तत्पर राहीन. ग्राहकांच्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जातील.”
ग्राहकांचे हक्क आणि सुरक्षा सुनिश्चित करणं हे आपलं प्राथमिक उद्दिष्ट असणार आहे. त्यामूळे ग्राहकांची होणारी फसवणूक आणि गैरव्यवहारापासून वाचविण्यासाठी विविध उपक्रम आणि कॅम्पेन चालवले जातील, याशिवाय विविध सरकारी योजनांचा अधिकाधिक लाभ ग्राहकांना कसा मिळवू शकतो याबद्दल जागरूकता वाढविणे आणि त्याबाबत प्रभावी पद्धतीने काम करणे हे देखील आमचं मुख्य ध्येय राहील.
त्यांच्या या निवडीबद्दल विविध सामाजिक व ग्राहक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली हवेली तालुक्यातील ग्राहक चळवळ अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
यावेळी बैठकीस प्रमुख उपस्थिती म्हणून अ. भा. ग्राहक पंचायतचे बाळासाहेब औटी अध्यक्ष- मध्य महाराष्ट्र प्रांत, विलास जगदाळे कोषाध्यक्ष- मध्य महाराष्ट्र प्रांत, भानुदास सरडे सदस्य -मध्य महाराष्ट्र प्रांत, नयना आभाळे प्रांत महिला आयाम प्रमुख, तुषार झेंडे अध्यक्ष – पुणे जिल्हा, देवेंद्र जगताप उपाध्यक्ष- पुणे जिल्हा, अशोक भोर सचिव- पुणे जिल्हा, राघवदास चौधरी कोषाध्यक्ष -पुणे जिल्हा, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर उंडे, दिलावर तांबोळी, देवानंद बवले, देविदास काळे आदी मान्यवर उपस्थित होते.







