आम्हाला आमचा रस्ता सुरक्षित आणि मजबूत हवा, शेडगावकरांची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत.
किती दादा, बापू, काका, साहेब आले आणि गेले; पण हा रस्ता कोणासमोर झुकला नाही.

अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी
आमच्या गावच्या रस्त्यांची निष्ठा खरंच वाखाणण्याजोगी आहे, ३० वर्षांपूर्वी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीच्या भाषणात ज्या खड्ड्यांचा उल्लेख व्हायचा, ते आजही तितक्याच दिमाखात तिथेच आणि तसेच आहेत. काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी… किती दादा, बापू, काका, साहेब आले आणि गेले; पण हा रस्ता कोणासमोर झुकला नाही. अगदी नवीन डांबर टाकलं तरी ४ महिन्यात हा रस्ता आपला ‘मूळ स्वभाव’ (खड्डे) परत मिळवतोच. याला म्हणतात खरी अटळ वृत्ती!
लोकांना वाटतं हे खराब रस्ते आहेत, पण मला वाटतं हा ३० वर्षांचा जतन केलेला ‘ऐतिहासिक वारसा’ आहे. ३० वर्षांत जग बदललं, नेते बदलले, पण आमच्या रस्त्यांनी आपलं अस्तित्व बदलू दिलं नाही. नवीन रस्ता बनवला तरी तो रस्त्याला मान्य नसतो, ४ महिन्यात तो पुन्हा ‘जैसे थे’ होतो. यात राजकारण्यांचा किंवा कंत्राटदाराचा काय दोष? रस्ताच बदलायला तयार नाहीये.
श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी ते शेडगाव रस्ता ठिकठिकाणी उखडून रस्त्याची चाळणी झालेली पाहायला मिळत आहे. एक वर्षापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कोट्यवधीचा निधी खर्च करून डांबरीकरण करण्यात आले परंतु कामाचा दर्जा तसेच ठेकेदाराने केलेले निकृष्ट दर्जाचे काम यामुळे रस्त्याची वर्षभरात दुरवस्था झाली.
आम्हाला आमचा रस्ता सुरक्षित आणि मजबूत हवा, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पद्धतीने प्रत्येक गोष्टीवर जनता टॅक्स भरते मग आमच्या हक्काच्या सेवा जातात कुठे अश्या आशयाची पोस्ट सध्या शेडगाव गावातील व्हॉट्सॲप ग्रुप, इंस्टाग्राम, फेसबुक इ. सोशल मीडियावर धुमाकुळ घालताना पाहायला मिळत आहे. श्रीगोंदा ते शेडगाव रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या काही दिवसात रस्त्यावर खड्डे पडू लागले. धुळीचे साम्राज्य पुन्हा उभे राहिले. अश्यातच रस्त्यावर अपघाताचे प्रमाण देखील वाढले. ग्रामपंचायत व नागरिकांनी निवेदन देऊन तसेच आंदोलन करून देखील काहीही परिणाम झालेला दिसत नाहीये. श्रीगोंदा टाकळी शेडगाव रस्त्याची अवस्था देखील अशीच झाली आहे रस्त्यावर खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच समजत नाही. त्यामुळे ग्रामस्थानी सोशल मीडियाचा वापर करून आपले प्रश्न सरकार दरबारी मांडण्याचा प्रयत्न केलेला दिसत आहे.










