अनाथ चिमुकल्यांच्या निरागस हास्यात फुलला अमित (महाराज) पवार यांचा वाढदिवस

भुलेश्वर राजा ग्रुपचा स्तुत्य उपक्रम: दिप गृह आश्रमात अन्नदान, खाऊ आणि शालेय साहित्याचे वाटप
पुणे (कासुर्डी ता.दौड):
आपला वाढदिवस अनाथ मुलांसोबत साजरा करून बघा, मनाला एक वेगळंच समाधान मिळेल… हे वाक्य आपण बरेचदा ऐकतो. पण हाच विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवून समाजासमोर एक नवा आदर्श भुलेश्वर राजा ग्रुपने निर्माण केला आहे. ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष व लोकप्रिय व्यक्तिमत्त्व मा.श्री. अमित (महाराज) पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ आश्रमातील मुलांसोबत आनंद सोहळा साजरा करत एक वेगळी सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.
दिप गृह सोसायटी, पुणे संचलित अनाथ आश्रमात भुलेश्वर राजा ग्रुपच्या वतीने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आश्रमातील चिमुकल्यांना भोजनासोबतच खाऊ आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
निरागस डोळ्यांतील आनंद हीच सर्वात मोठी भेट!
या भावुक प्रसंगी बोलताना कार्यकर्त्यांनी सांगितले, या मुलांना आपण जितकं जवळ करतो, त्याच्या दुप्पट प्रेम आणि आशीर्वाद त्यांच्याकडून मिळतात. त्यांच्याशी प्रेमाने बोलताना मनाला मिळणारी शांती शब्दांत मांडता येत नाही. कोणतीही श्रीमंतीची स्पर्धा नाही, की कोणापेक्षा श्रेष्ठ असण्याची जाणीव नाही… केवळ निखळ प्रेम आणि संकटांवर हसतमुखाने मात करण्याचे धैर्य या मुलांच्या नजरेत दिसून येते.
माणुसकीचा आणि संघर्षाचा वारसा
अमित (महाराज) पवार हे केवळ एक मार्गदर्शक म्हणून नव्हे, तर एक उत्तम संवेदनशील माणूस म्हणून नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. आजच्या या उपक्रमामुळे मुलांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य हीच त्यांच्यासाठी वाढदिवसाची सर्वात अमूल्य आणि खास भेट ठरली.
या स्तुत्य उपक्रमाचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत असून, वारसा संघर्षाचा, अखंड जनसेवेचा हा ध्यास जपत अमित (महाराज) पवार यांना भुलेश्वर राजा ग्रुप मित्र परिवाराकडून उदंड आणि निरोगी आयुष्याच्या अनंत शुभेच्छा देण्यात आल्या.
या वेळी भुलेश्वर राजा ग्रुप चे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते










