मराठवाडामहाराष्ट्र

महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बिगर राजकीय, निवृत्त IPS अधिकाऱ्याची नियुक्ती करावी – पायल बुलबुले

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर बिगर राजकीय व निवृत्त आयपीएस (IPS) अधिकारी महिलांची नियुक्ती करावी, अशी ठाम मागणी सामाजिक कार्यकर्त्या पायल बुलबुले यांनी केली आहे. महिलांना निष्पक्ष व तटस्थ न्याय मिळण्यासाठी हा निर्णय अत्यंत गरजेचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आजपर्यंत महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बहुतांश वेळा राजकीय पार्श्वभूमी असलेल्या महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाशी संबंधित व्यक्ती, तसेच काही वेळा राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांनाही संधी देण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळाले. या नियुक्त्यांमुळे आयोगाच्या कामकाजावर राजकीय प्रभाव पडत असल्याची चर्चा वारंवार होत असते.

काही प्रकरणांमध्ये पोलिसांवर दबाव आणला जात असल्याचेही सांगितले जाते. परिणामी, पीडित महिलांना न्याय मिळण्याऐवजी त्यांच्यावर अन्यायच होत असल्याच्या तक्रारी समोर येत असल्याचे पायल बुलबुले यांनी नमूद केले. त्यामुळे या पदावर राजकीय व्यक्तीऐवजी निष्पक्ष, प्रामाणिक आणि कायदा व सुव्यवस्थेचा अनुभव असलेल्या निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या की,

“महिला आयोग हे महिलांच्या हक्कांचे संरक्षण करणारे अत्यंत संवेदनशील व्यासपीठ आहे. येथे कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप असू नये. जर आयोगावर विश्वास ठेवायचा असेल, तर अध्यक्षपदावर अनुभवी आणि निष्पक्ष अधिकारी असणे अत्यंत गरजेचे आहे.”

राज्यात महिला सुरक्षेचे प्रश्न वाढत असताना महिला आयोगाची भूमिका अधिक प्रभावी आणि विश्वासार्ह असणे आवश्यक आहे. त्यामुळे शासनाने तातडीने योग्य निर्णय घेत, बिगर राजकीय आणि सक्षम महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button