पश्चिम महाराष्ट्रपुणे

जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी देशात चमकली.

नीट' (NEET) परीक्षेत ७२० पैकी ७१० गुण मिळवत मिळवले दैदिप्यमान यश.

पुणे जिल्हा प्रतिनिधी: कोणताही मोठा गाजावाजा न करता, केवळ जिद्द, चिकाटी आणि अभ्यासातील सातत्याच्या जोरावर जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलेल्या श्रावणी कृष्णा कुदळे हिने ‘नीट’ (NEET) परीक्षेत देशपातळीवर ऐतिहासिक यश संपादन केले आहे. श्रावणीने ७२० पैकी तब्बल ७१० गुण मिळवून देशात ओबीसी मुलींच्या प्रवर्गात प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर संपूर्ण देशात (AIR) ५ वा आणि महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवून कुदळे परिवारासह खडकी गावचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे.

शिक्षक दाम्पत्याचा वारसा

श्रावणी ही राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक सौ. जयश्री आणि श्री. कृष्णा कुदळे सर यांची कन्या आहे. कुदळे दाम्पत्य हे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असून, तालुक्यात व जिल्ह्यात त्यांच्या उत्कृष्ट हस्ताक्षर कलेसाठी विशेष ओळखले जातात. आपल्या पालकांचा हाच कष्टाचा आणि कलेचा वारसा श्रावणीने आपल्या अभ्यासातून पुढे नेला आहे.

जि. प. शाळा ते देशपातळीवर गौरव

श्रावणीचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेतून झाले आहे. प्राथमिक शाळेत असल्यापासूनच ती अत्यंत हुशार आणि अभ्यासू होती. दरवर्षी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये हिरीरीने भाग घेऊन तिने शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत आपले स्थान कायम राखले होते. त्यानंतर सेमी इंग्रजी माध्यमातून तिने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

इंग्रजी माध्यमाचा कोणताही डामडौल नसताना, निव्वळ अभ्यासातील सातत्य आणि कठोर परिश्रमाच्या बळावर तिने हे उत्तुंग यश मिळवून दाखवले आहे. एका जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिकून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर श्रावणीने यशाचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून, तिच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

श्रावणीच्या या दैदिप्यमान यशाबद्दल कुदळे कुटुंबियांचे आणि श्रावणीचे मनःपूर्वक अभिनंदन! तिच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button