जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत पिसोरे खांड जिल्हा परिषद शाळेचे यश.

गणेश सुपेकर अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी
जिल्हा परिषद अहिल्यानगर, प्राथमिक शिक्षण विभाग यांच्या वतीने नुकत्याच त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल, नेवासा येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत श्रीगोंदा तालुक्यातील पी.एम.श्री.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिसोरे खांड शाळेतील बाल खो-खो पटू मुले आणि मुली यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून तृतीय क्रमांक पटकावला.
पिसोरे खांड शाळेच्या १४ वर्ष वयोगट मुले आणि मुली या दोन्ही संघानी श्रीगोंदा तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले.सदर जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील १६ संघानी सहभाग नोंदवला.नियमित शिस्तबद्ध सराव, नियमांची अचूक माहिती या जोरावर मुलांच्या संघाने संगमनेर आणि कोपरगाव संघाला पराभूत केले तर मुलींच्या संघाने जामखेड आणि अकोले संघाला धूळ चारली.विजयी संघाना क्रीडाशिक्षक आकाश महाडिक यांच्याबरोबरच मुख्याध्यापक श्री. हातवळणे सर तसेच शाळेतील शिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. पिसोरे खांड सारख्या ग्रामीण भागातील शाळेने मिळविलेल्या या दैदिप्यमान यशाबद्दल सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हा.चेअरमन, शाळा व्यवस्थापन समिती तसेच पिसोरे खांड ग्रामस्थांनी कौतुक करून अभिनंदन केले.










