श्रीगोंदा-मांडवगण रस्त्याचे रखडलेले काम अखेर सुरू.
आनंदकर यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाची हालचाल.
अहिल्यानगर : मागील तीन महिन्यांपासून बंद असलेल्या श्रीगोंदा-मांडवगण रस्त्याचे काम अखेर सुरू करण्यात आले आहे. रस्त्याचे काम तातडीने सुरू करून पूर्ण करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष संजय आनंदकर यांनी तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. या निवेदनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या श्रीगोंदा उपविभागाने रस्त्याचे काम सुरू केल्याची माहिती पत्राद्वारे दिली आहे.
श्रीगोंदा-मांडवगण रस्त्याचे काम मागील तीन महिन्यांपासून पूर्णपणे बंद असल्याने या मार्गावरून प्रवास करणारे नागरिक, शेतकरी, विद्यार्थी तसेच व्यावसायिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता. अर्धवट कामांमुळे अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले होते.या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना होणारा शारीरिक तसेच मानसिक त्रास लक्षात घेऊन रस्त्याचे काम विलंब न लावता पुन्हा सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी आनंदकर यांनी केली होती.दरम्यान, रस्त्याच्या कामासंदर्भात सोमवार दि.१० ऑगस्ट रोजी करण्यात येणारे प्रस्तावित ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित करीत असल्याचे आनंदकर स्पष्ट केले.रस्त्याचे काम सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असून, काम दर्जेदार पद्धतीने आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.











